19 ऑगस्ट हा दिवस समाज दिन | 19 AUGAST SAMAJ DIN
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण 19 ऑगस्ट हा दिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवसाचे महत्व आणि माहिती आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत.
Allmarathiinfo04 |
'बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य आठवले की सर्वांच्या नजरेसमोर येते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था आणि या शैक्षणिक संस्थेचा आज असणारा महत्वपूर्ण दिवस! अर्थातच मविप्र समाजदिन! संस्थेतील सर्व शाखांतील विद्यार्थी, सर्व सेवक व सर्वसाधारण समाज यांना संस्थेच्या कार्याची ओळख व्हावी, संस्थेचे ऋण व्यक्त करता यावे व संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचे कृतज्ञतापुर्वक स्मरण व्हावे म्हणून १९८२ पासून संस्था कै. रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट हा समाजदिन म्हणून साजरा करते. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सर्व संस्थापकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून दिली जाते.
कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म १९ ऑगस्ट १८९० रोजी कसबे सुकणे (ता.निफाड) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीभाऊ सखाराम पाटील- थोरात असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई उर्फ नानी थोरात असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण वणी (ता. दिंडोरी) येथे झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जॉर्ज हायस्कूल, नाशिक येथे झाले. त्यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव होता.
रावसाहेब थोरात हे संस्थेचे आद्य संस्थापक होय. बहुजन समाजातील शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण पाहून राजर्षी शाहू महाराज थोर समाजसेवक गणपतदादा मोरे, कॅप्टन डी. आर. भोसले आणि किर्तीवानराव निंबाळकर यांच्याबरोबर समाजजागृतीच्या कार्याने प्रभावित होऊन संस्थेच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. जुलै १९१४ मध्ये नाशिक शहरातील राठी भवन इमारतीत वसतिगृह सुरू करून त्यांनी संस्थेचे रोपटे लावले तेव्हा ते अवघ्या २४ वर्षाचे होते. त्यानंतर अखेरपर्यंत मोलाचे योगदान देत आयुष्यभर संस्थेच्या संगोपन कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. ग्रामीण भागात त्यांनी गावोगावी फिरून शेतकर्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याबाबत पालकांचे मन वळविले. शेतकरी, ग्रामीण लोकांमध्ये शिक्षणाचे महत्व बिंबविले. १९४१ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावसाहेब’ ही पदवी दिली. संस्थेने त्यांच्या कार्याची माहिती, तसेच नव्या पिढीला आदर्श ज्ञात व्हावा म्हणून ‘केटीएचएम’ महाविद्यालय नाशिक, माध्यमिक विद्यालय वणी, कनिष्ठ महाविद्यालय, मौजे सुकेणे, माध्यमिक शाळा मोहाडी आणि संस्थेच्या सभागृहाला त्यांचे नाव दिले. १९८२ पासून त्यांचा जन्मदिन संस्थेतर्फे ‘समाजदिन’ म्हणून साजरा केला जातो.
नाशिक जिल्हा बोर्डाचे ते अध्यक्ष होते. मुंबई प्रांत विधिमंडळात व मुंबई राज्य विधानसभेत आमदार म्हणूनही त्यांनी कार्य केले. १३ मार्च १९५८ ला कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद अंगीकारून तसेच बहुजन सेवा हीच ईश्वर सेवा व मविप्र समाज हाच आपला संसार मानून संस्थेच्या कार्यविस्तारात आणि कार्य प्रशासनात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्याबरोबर अण्णासाहेब मुरकुटे, पदमश्री काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, गणपतदादा मोरे, डी. आर. भोसले यांचा सिंहाचा वाटा होता. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवापूर्वी व त्यानंतरच्या दीर्घ कालखंडात संस्थेचे मार्गदर्शक अॅड. बाबुराव ठाकरे व आधारस्तंभ कै. अॅड. विठ्ठलराव हांडे यांनी संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळून मविप्रच्या कार्याला प्रचंड गती देऊन कार्यविस्तार व विकास केला. कै. डॉ. वसंतराव पवार यांनी शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसुत्रीचा अवलंब करत संस्थेच्या गुणवत्ता व कार्य विस्तारात सिंहाचा वाटा उचलून बहुमूल्य योगदान दिले.
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी १९१४ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. म. फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे आदी महान विभूतींच्या कार्यातून प्रेरणा घेत कर्मवीर रावसाहेबथोरात तसेच, इतर कर्मवीरांनी संस्थेची स्थापना केली. संस्थेने आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आणि भविष्यात गुणवंत विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून घडत राहतील. मविप्र समाज संस्थेच्या आद्य कर्मवीरांपैकी एक असणारे अर्थातच कर्मवीर रावसाहेब थोरात. त्यांनी संस्थेसाठी अतिशय भरीव असे योगदान दिले. संस्था स्थापन करण्यापासून ते संस्थेचा विकास त्यांनी घडवून आणलेला आहे. त्यांचे हे संस्थेसाठीचे कष्ट पाहता, आपली संस्था सन १९८२ पासून कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस म्हणजेच १९ ऑगस्ट मराठा विद्या प्रसारक समाजदिन म्हणून साजरा करत असते. शिक्षणप्रसार हीच देशभक्ती या श्रध्देने मविप्र समाज संस्था कार्य करत आली आहे आणि करत राहील. स्वहित बाजूला ठेवून कार्य केलेल्या सर्व समाजधुरिणांना मानाचा मुजरा !
समाजगीत
जनकल्याणी देह झिजवूनी लाजविले चंदना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना
तुम्हाला लाख लाख वंदना ||धृ.||
ऋषिराजाने राजर्षी लावियली ज्योत
वसा ज्योतीचा घेऊनी साचा पेटविला पोत
दिशादिशांतून घराघरांतून आली नवजाग
दिसू लागला मनामनातला मुक्तीचा मार्ग
निद्रेतच होते दंग
अंतरातले स्फुर्लिंग
ते उठले उधळीत रंग
बहुजन हिताय, बहुजन सुखाय चेतविली चेतना
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||१||
नांगर टाका भाला फेका शिकवी शिवराया
त्याच मातीवर कसुनी कंबर करुया नव किमया
निरलस श्रमुनी काढू खणूनी रुतलेली शल्ये
निष्ठा शिंपून करु पेरणी हवी नवी मूल्ये
दृढ निश्चय ऐसा करुनी
कार्यात प्राण ओतुनी
आयुष्य दिले झोकुनी
ज्ञानप्रशाला उभारण्याला दिलीत हो प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||२||
मूक अडाणी फुलवू अग्रणी त्यातूनी ही जिद्द
मुळात अबला करु या सबला धन्य धन्य ब्रीद
दिव्य थोरवी कुठली ओवी गुंफावी गौरवा
नम्रपणाने एक मागणे हट्ट हाच पुरवा
निरपेक्ष अपुली कृती
ती सेवाभावी मती ती
निष्ठा तसली ध्रुती
समाजदिन हा सार्थ कराया द्या हो द्या प्रेरणा
कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना ||३||
- कै.प्रा. श्रीरंग गुणे
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.