Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन

 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य दिन या विषयावर माहिती बघणार आहोत.

Allmarathiinfo05


भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कायम होते. २६ जानेवारी १९५० रोजी (भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो) भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला. मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, ज्यामध्ये ब्रिटीश भारत हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला. फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. धार्मिक हिंसाचारामुळे जवळपास १.५ कोटी लोकांनी स्थलांतर केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. हा संपूर्ण कार्यक्रम भारताचा राष्ट्रीय प्रसारक असलेल्या दूरदर्शनद्वारे प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम शक्यतो उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनई संगीताने सुरू होतो.

स्वातंत्र्य दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेची सजावट. चित्र: १४ ऑगस्ट २०१६, मुंबई

संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते. 


इतिहास -

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.


स्वातंत्र्य दिनाचा उत्सव - 

स्वातंत्र्य दिन हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक असतो. (इतर दोन म्हणजे २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन आणि २ ऑक्टोबर- महात्मा गांधींचा जन्मदिन.) हा दिवस सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित" करतात. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडकावतात . आपल्या भाषणात पंतप्रधान गेल्या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात, महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि पुढील विकासाचे आवाहन करतात. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. " जन गण मन " हे भारतीय राष्ट्रगीत गायले जाते. भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यांचा मार्च पास्ट होतो. परेड आणि स्पर्धांमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील देखावे आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडते. अशाच घटना राज्यांच्या राजधानीत घडतात जेथे वैयक्तिक राज्यांचे मुख्यमंत्री राष्ट्रध्वज फडकवतात, त्यानंतर परेड आणि स्पर्धा होतात. 1973 पर्यंत राज्याचे राज्यपाल राज्याच्या राजधानीत राष्ट्रध्वज फडकावत असत. फेब्रुवारी १९७४ मध्ये, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे हा मुद्दा उचलून धरला की पंतप्रधानांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी देण्यात यावी. १९७४ पासून संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी आहे. ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम देशभरातील सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये होतात.  शाळा आणि महाविद्यालये ध्वजारोहण समारंभ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. सरकारी आणि गैर-सरकारी संस्था त्यांचे परिसर कागदाने सजवतात, फुग्याने त्यांच्या भिंतींवर स्वातंत्र्यसैनिकांच्या चित्रांची सजावट करतात आणि मोठ्या सरकारी इमारती अनेकदा दिव्यांच्या तारांनी सुशोभित केल्या जातात.  दिल्ली आणि इतर काही शहरांमध्ये पतंगबाजीने या प्रसंगात भर पडते. देशाप्रती निष्ठेचे प्रतीक म्हणून विविध आकारांचे राष्ट्रीय ध्वज मुबलक प्रमाणात वापरले जातात. नागरिक त्यांचे कपडे, मनगटी, कार, घरगुती उपकरणे तिरंगी प्रतिकृतींनी सजवतात. कालांतराने, या उत्सवाने राष्ट्रवादापासून भारतातील सर्व गोष्टींच्या व्यापक उत्सवात बदल केला आहे.अनिवासी भारतीय हे जगभरातील स्वातंत्र्य दिन हा परेड आणि विविध स्पर्धांसह साजरा करतात. विशेषतः भारतीय स्थलांतरितांची संख्या जास्त असलेल्या प्रदेशांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. काही ठिकाणी, जसे की न्यू यॉर्क आणि इतर यूएस शहरांमध्ये, 15 ऑगस्ट हा अनिवासी भारतीयां साठी आणि स्थानिक लोकांमध्ये "भारत दिन" बनला आहे. तर काही ठिकाणी १५ ऑगस्टला किंवा त्याच्या लगतच्या वीकेंडच्या दिवशी "इंडिया डे" साजरा करतात. 

भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते.भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.


स्वतंत्र भारत-

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे ट्रीस्ट विथ डेस्टिनी हे जगप्रसिद्ध भाषण देताना.

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते.रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.


भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ -

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना तयार होईपर्यंत १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टची अंमलबजावणी होईल असा निर्णय घेण्यात आला.


#माऊंटबॅटन योजनेबरहुकुम भारतीय स्वातंत्र्याचे बील इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात आले. ॲटली सरकारने १८ जुलै १९४७ रोजी त्यास मान्यता दिली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्यातील तरतुदी अशा -


१) या कायद्याने भारत -पाकिस्तान ही दोन सार्वभोम राष्ट्रे निर्माण झाली.



२) दोन्ही राष्ट्रींची विधिमंडळ आपापल्या देशात कायदे करण्यास सार्वभोम झाली.



३) नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत सध्या अस्तित्वात असलेल्या घटना समित्याच कायदेमंडळाचीही कामे करतील या कायदेमंडळास घटना तयार करण्याखेरीज पूर्वीच्या मध्यवर्ती कायदेमंडळाचे सर्व अधिकार असतील.



४) १५ ऑगस्ट १९४७ नंतर ब्रिटिश सरकारच्या या दोन्ही राज्यावर किवां प्रांतावर काही अधिकार रहाणार नाही.



५) नवी घटना तयार होईपर्यंत केंद्राचा व प्रांताचा कारभार १९३५ कायद्याने करावा व आवश्यकता वाटल्यास बदल करावेत.



६) ब्रिटिश बादशहाकडे असलेले सार्वभोम सत्तेचे सर्व अधिकार हिंदी सस्थानाकडे देण्यात आले व ही संस्थाने व ब्रिटिश राज्य यांच्या दरम्यान झालेले सर्व करार, तहनामे १५ ऑगस्टपासून रद्द ठरतील .



७) भारतमंत्र्याचे अधिकारपद रद्द करण्यात येऊन त्याचे काम ' राष्ट्रकुल ' खात्याच्या सेक्रेटरीकडे देण्यात आले.



८) ' भारताचे सम्राट' हा ब्रिटिश राजाचा किताब रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले.



उपरोक्त तरतुदीखेरीज सैन्य, वरिष्ठ सनदी नोकर , फाळणीची यंत्रणा , गव्हर्नर जनरलचे अधिकार , गोऱ्या सैन्याची रवानगी इंग्लंडला इ. विषयासंबंधीचा तपशीलही स्वातंत्र्याच्या कायद्यात नमूद केला होता.


या कायद्याने भारतावरील ब्रिटिश सत्ता पूर्णपणे नष्ट झाली व भारत - पाकिस्तान ही दोन स्वतंत्र सार्वभोम राष्ट्रे म्हणून जगाच्या नकाशात झळकू लागली आणि अशा रीतीने भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील भारत - ब्रिटन संबंधातील हा शेवटचा टप्पा ठरला.


भारताचा ध्वज -

भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला सामान्यतः तिरंगा म्हणतात, हा केसरी , पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षैतिज आयताकृती ध्वज आहे; तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे.

कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा (हाताने कातलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते) किंवा रेशमाचा असावा. ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात. हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाकडे आहे, जो प्रादेशिक गटांना त्याचे वाटप करतो. २००९ पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता होता. ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्यांद्वारे नियंत्रित केला जातो. मूळ संहितेमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे. २००२ मध्ये नवीन जिंदाल या नागरिकाच्या अपीलावर सुनावणी करताना, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरासाठी संहितेत सुधारणा केली. २००५ मध्ये कपड्यांच्या विशिष्ट प्रकारांवरील रूपांतरांसह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली. ध्वज संहिता ही ध्वज फडकवण्याच्या प्रोटोकॉलला आणि इतर राष्ट्रीय व गैर-राष्ट्रीय ध्वजांच्या संयोगाने त्याचा वापर करण्यात नियंत्रित करते.


ध्वजाची रचना-

ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :


रंग अर्थ-

केशरी    : त्याग, शौर्य

पांढरा     :  शांती

निळा     :  अशोक चक्र

हिरवा     :  समृद्धी


भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा म्हणता येईल. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.



ध्वजांचा इतिहास -


ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.


१८३१साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७ च्या युद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.



राष्ट्रध्वजाचे साहित्यिक व सांस्कृतिक उल्लेख-


भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विविध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।" ह्या गीतास १९३८ च्या काँग्रेस आधीवेशनात[ दुजोरा हवा] 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.


स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, "अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.


'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बॉंकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायकः महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..." पुणे आकाशवाणीवरून प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरूंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.


स्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात "नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.


भारतीय संविधानात नमूद नागरिकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरिकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते.



About Author:

allmarathiinfo04 या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.